
खेडमध्ये ग्रामसेवकांची पदे अद्याप रिक्त
अतिरिक्त कार्यभारामुळे कारभार हाकताना दमछाक
खेड :तालुक्यातील २१४ गावांतील ११२ ग्रामपंचायतीचा कारभार अवघ्या ६७ ग्रामसेवकांच्या हातात आहे. ३५ पदे अद्यापही रिक्तच आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत ग्रामसेवकांना अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळताना कसरत करावी लागत आहे. ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच हालचाली होत नसल्याने याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे अनेक ग्रामसेवकांकडे दूरवरच्या ग्रामपंचायतींचा कारभार सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे ग्रामसेवकांची ससेहोलपट सुरू आहे. याशिवाय त्या-त्या गावातील ग्रामस्थांनाही अनेक वेळा ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागते.
खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची १५ पदे मंजूर असतानाही अवधे १३ ग्रामविस्तार अधिकारी कार्यरत आहेत. २ ग्रामविस्तार अधिकाऱ्याची पदे अद्याप रिक्त आहेत. ग्रामसेवकांच्या ८७ मंजूर पदांपैकी ३३ ग्रामसेवकांची पदे अद्याप रिक्त आहेत. कार्यरत ग्रामसेवकांवर अन्य २ ते ३ ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. हा कार्यभार सांभाळताना ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नाही. यामुळे त्या-त्या गावातील ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामसेवक नेमके कधी उपलब्ध होतील? याचा थांगपत्ता लागत नसल्याने ग्रामस्थांना तासन्तास ग्रामपंचायत कार्यालयात तिष्ठत बसावे लागत आहे.
खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्रामसेवक अतिरिक्त ग्रामपंचायतींचाही नेटाने कारभार करत ग्रामस्थांच्या अडचणींची सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचालीच होत नसल्याने याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. याची प्रशासनाने गांभीर दखल घेवून ग्रामसेवकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.