
मिरजोळे -नाखरेकरवाडीत विनापरवाना हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त
रत्नागिरी :जिल्ह्यात अवैध हातभट्टीची गावठी दारु-मटका जुगार, सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन अशा सातत्याने पोलिसांकडून कारवाई केल्या जाते आहे. मात्र अवैध धंदे वाढतच असल्याचे चित्र आहे. शनिवारी शहराजवळील मिरजोळे -नाखरेकरवाडी येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टी दारु अड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत १९ हजार १०० रुपयांचे मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र चंद्रकांत मयेकर (वय ४७, रा. मिरजोळे, नाखरेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) सकाळी सव्वासातच्या सुमारास मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजोळे येथील जगंलमय भागात अवैध हातभट्टीची गावठी दारु व्यवसाय सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे शनिवारी पोलिसांनी सकाळी सव्वा सातच्या सुमारास नाखरेकरवाडी येथील जंगलमय भागात आपला मोर्चा वळवला आणि गावठी हातभट्टीच्या दारु अड्यावर धाड टाकली. या धाडीत २ हजार ३०० रुपयांचे एक पत्र्याचे बॅरल, कुजके रसायन, ११ हजार २०० रुपयांचे चार पत्र्याची बॅरल त्यामध्ये नवसागर गुळ मिश्रीत कुजके रसायन, दुसरे ४ हजार ४०० रुपयांचे १ प्लास्टिकचे बॅरल, ८५० रुपयांची १५ लिटर तयार दारु, ३०० रुपयांचा गोलाकार डेगस ५० रुपयांची चाटू असा सुमारे १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिस पथकाने जप्त केला.
या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.