
दापोली पंचायत समिती अधिकारी- कर्मचार्यात हाणामारी
दापोली : दापोली पंचायत समिती कृषी विभागातील कृषिधन पर्यवेक्षक आणि वाकवली पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्यातील वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे दिसून आले.
या मारहाणीत कर्मचारी रक्तबंबाळ झाला. या वादावर गटविकास अधिकाऱ्यांकडून (बिडीओ) न्याय मिळण्याची गरज असताना दोघांकडून लेखी लिहून घेत घडल्या प्रकारावर पडदा टाकला असल्याचे चर्चा आहे. या हाणामारीची चर्चा दापोली पंचायत समिती परिसरात रंगली आहे.
दि. २३ रोजी सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. कृषिधन पर्यवेक्षक विभागात दुपारी अचानक जोरजोरात आरडाओरड झाली. यावेळी पंचायत समिती विभागातील अनेक कर्मचारी आणि कामांसाठी आलेल्या नागरिकांची धावाधाव झाली. यावेळी काही पत्रकारदेखील पंचायत समितीत कामानिमित्त आले होते. यावेळी जोरजोरात ओरड झाल्याने पत्रकारांनी हा विषय जाणून घेतला. तर कर्मचारी रक्तबंबाळ का झाला? अशी विचारणा केली. यावेळी काही कर्मचारी यांनी त्याला हातातील घड्याळ लागले, अशी सारवासारव करत घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.
यावेळी पत्रकारांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत घडल्या प्रकरणाची विचारणा केली. त्यांनाही या विषयाची माहिती नव्हती. दोन्ही व्यक्तींकडून हा प्रकार जाणून घेतला. दापोली पंचायत समिती विभागात घडलेला हा प्रकार गंभीर असून अधिकाऱ्यांचा धाकच उरला नसल्याचे बोलले जात आहे.