
ऐनवली येथील जागेतील गेट चोरला
खेड:- खेड ते आंबवली मार्गावरील रस्त्यालगत मौजे ऐनवली येथील जागेतील गेट चोरीला गेला आहे. त्याची किंमत सुमारे ३० हजार इतकी असून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील मौजे ऐनवली येथील गट नंबर २५० मध्ये आंबा, काजू, सुपारी, नारळ व अन्य झाडांची लागवड शेतकरी राजेंद्र वामन मोरे यांनी केलेली आहे. संपूर्ण जागेला बंदिस्त कंपाऊंड असून खेड ते आंबवली रहदारीच्या रस्त्यावर ही जमीन असल्याने रस्त्याच्या बाजूस लोखंडी गेट उभारला होता. दि. २९ सप्टेंबर सकाळी ९ ते दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास दोन झडपी गेटच अज्ञात चोरांनी चोरुन नेला. या गेटची किंमत सुमारे ३० हजार इतकी आहे. अशी तक्रार ऐनवलीचे शेतकरी राजेंद्र मोरे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.