
चिपळूण शहरातील नियमबाह्य जाहिरात फलक जप्त
चिपळूण : शहरातील नियमबाह्य जाहिरात फलक जप्त करण्यासह संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने असे सर्व फलक जप्त करून अनेकांना दणका दिला आहे.
सध्या शहरात विविध मंडळांच्या माध्यमातून सार्वजनिक जागेत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. अशा फलकांचीही दखल न. प. प्रशासनाने घेत संबंधित मंडळांकडून जाहिरात फलकांची कर वसुली मोहीम सुरू केली आहे.
सण, उत्सव, वाढदिवस, लोकप्रतिनिधींचे दौरे यासंदर्भात मोठमोठे बॅनर व फलक बेकायदेशीररित्या उभारले जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचाही आरोप मुकादम यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीतून त्यांनी जिल्ह्याबाहेरील कार्यक्रमाचे बॅनर पलिकेची कोणतीही परवानगी न घेता व जाहिरात शुल्क न भरता शहर परिसरात झळकत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.