
पदवीधर मतदारांना नोंदणीचे आवाहन
रत्नागिरी:केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोकण पदवीधर मतदार संघाचा मतदार यादी पुनर्रचना निरीक्षण कार्यक्रम ६ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी या यादीत आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखाने केले आहे.
कोकण पदवीधर मतदार संघ मतदार यादी पुनर्रचना निरीक्षण कार्यक्रमात सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमात आपली नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरिता आवश्यक कागदपत्रांसह नमुना नंबर १८ हा विहित नमुन्यातील अर्ज भरुन संबंधित तहसील कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.
मतदार संघाची यादी नव्याने तयार करण्यात येत असल्याने सर्व मतदारांना आपली नोंदणी नव्याने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी निवडणूक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन केले.