
रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण
ओनेस्ट गुरुकुलचा अभिनव उपक्रम
रत्नागिरी :रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्याचा अभिनव उपक्रम ओनेस्ट गुरुकुल या शाळेने शनिवारी राबविला. या उपक्रमा अंतर्गत वटवृक्षाचे पुनर्रोपण नाचणे आंबेशेत रस्त्यावरील शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे तसेच डॉक्टर निलेश शिंदे यांनी अनुकरणीय उपक्रम अशा शब्दात प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते.
शाळेच्या संचालिका नेहा पित्रे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की गुरुकुलाचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची लागवड करताना रुंदीकरणासाठी तोडल्या जाणाऱ्या वृक्षाची निवड करून वृक्ष संवर्धनाचा आगळावेगळा प्रयोग आम्ही केला आहे. नावातच ‘गुरुकुल’ हा शब्द असलेल्या या शाळेमध्ये मानवी नीती मूल्ये रुजवणे, समृद्ध भारतीय परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊन त्या परंपरेशी त्यांचे नाते दृढ करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शाळेचे कामकाज चालविले जाणार आहे.

पुढे त्या म्हणाल्या प्राचीन काळी ऋषींच्या आश्रमात वटवृक्षाच्या पारावर बसून शिष्य अध्ययन करीत असत. आजही आधुनिक शिक्षण देताना निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याला पोषक असणाऱ्या वटवृक्षाच्या छायेत विद्यार्थी काही तास अध्ययन करतील. परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि सर्वाधिक प्राणवायू देणारा वृक्ष म्हणून वटवृक्षाची निवड केल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यातही अशाप्रकारचे वृक्ष पुनर्रोपण करण्याचा शाळेचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. तोरल शिंदे आणि डॉ. निलेश शिंदे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, ओनेस्ट गुरुकुलने केलेला वृक्ष पुनर्रोपणाचा उपक्रम अतिशय अनुकरणीय आहे. आज केलेल्या या कार्याचा भावी काळात या शाळेतील विद्यार्थ्यांना अभिमानच वाटेल. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांना जीवदान देण्याचे कार्य आपणही प्रत्येकाने करायला हवे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

या कार्यक्रमाला शाळेचे संचालक मिथिल पित्रे, तसेच हितचिंतक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.