
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
चिपळूण :येथे मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदेश यशवंत तामुंडकर (५०, रा. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. ट्रक चालक सहाबुद्दीन मोहम्मद (रा. हरियाणा) हा मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेच्या दिशेने चिपळूणकडे येत होता. त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात संदेश तामुंडकर यांच्या दुचाकीला त्याची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार संदेश तामुंडकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.