
पाली बाजारपेठेत एसटीला मोटारीची धडक; मोटार चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी :तालुक्यातील पाली बाजारपेठ येथे गोवा-मुंबई जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे मोटार चालवून एसटी बसला धडक दिली. या अपघातात डॉक्टर जखमी झाले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मोटारचालक डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. केदार माधवराव रेटरेकर (साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे संशयित मोटारचालक डॉक्टरचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ७) सकाळी सातच्या सुमारास पाली बाजारपेठ येथील गोवा-मुंबई जाणाऱ्या रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.रेटरेकर मोटार (एमएच ०८ आर ४४२३) घेऊन रत्नागिरी ते साखरपा असे जात असताना पाली एसटी स्टॅण्ड ते रत्नागिरी बाजूने जाणाऱ्या एसटीला (एमएच १४ बीटी २५३२) समोरून धडक दिली. या अपघातात रेटरेकर जखमी झाले.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार संतोष कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मोटारचालक डॉ. रेटरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.