
प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
रत्नागिरी :जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची २०२३ -२०२८ ची स्थगित झालेली निवडणूक जाहीर झाली असून १६ जागांसाठी ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल ५ नोव्हेंबर रोजी होईल. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ५ हजार २०० मतदार आपला कौल देणार आहेत.
प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यमान संचालक मंडळ १० मे २०१७ रोजी अस्तित्वात आहे होते. कोरोनामुळे सर्वच सहकारी संस्था निवडणुक पुढे गेल्यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाला मे २२ पासून मुदतवाढ मिळाली होती. ५ जून २०२३ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार १६ जागांसाठी तब्बल १०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ते सर्व वैध ठरले होते. २३ जुलै रोजी होणारी निवडणूक सहकार खात्याच्या २८ जून च्या आदेशानुसार ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित झाली होती. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती पॅनेल व महापरिवर्तन सहकार आघाडी यामध्ये रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. महापरिवर्तन सहकार आघाडीचे सर्व १६ उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र विद्यमान सत्ताधारी पॅनेलकडून खेड तालुका, जिल्हा सर्वसाधारण व महिला राखीव उमेदवार निवडीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी तर निशाणी वाटप २६ ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी लढतीचे चित्र स्पष्ट होईल.