
खेड बसस्थानकात महिलेची दागिन्यांची पर्स अज्ञाताने लांबवली
खेड :खेड बसस्थानकातील प्रवाशांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. १७ सप्टेंबरला खेडहून दापोली वाकवली येथे प्रवास करण्यासाठी स्थानकात थांबलेल्या महिला प्रवाशाची पर्स लांबवून त्यातील १ हजार रोकड व १ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
खेड एसटी बसस्थानकात आलेली महिला हातातील पर्स इतर बॅगच्या बाजूला ठेऊन ती एसटी स्टॅंडमध्ये बस लागली की नाही हे पाहण्याकरिता गेली. परत आल्यानंतर बॅगच्या जवळ ठेवलेली पर्स तक्रारदार यांनी हातात घेतली. ती महिला खेड-दापोली बसने घरी परतली. त्या गाडीत त्यांचे पती, मुलगी, मुलगा असे बसने वाकवली येथे ४ वा. च्या सुमारास पोहचले. त्या वेळी तांदूळ घेण्याकरिता किराणा मालाच्या दुकानात गेले. तांदळाचे पैसे देण्याकरिता तक्रारदार यांनी पर्स उघडली असता पर्समध्ये ठेवलेली जांभळ्या रंगाची छोटी पर्स दिसून आली नाही. या प्रकरणी सुरवातीला हा तपास दापोली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता; मात्र घटना खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा येथील पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.