
एसटी बस- कंटेनर अपघात; दोघे गंभीर जखमी
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ मोरेवाडीनजीक भरधाव एस. टी. बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोघेही चालक गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात सोमवारी (दि. १८) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. भरधाव एस. टी. बस रस्त्याचा दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळली आणि हा भीषण अपघात घडला. यात एस. टी. चे मोठे नुकसान झाले आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी येत आहेत. ज्यादा एस.टी. बस सोडण्यात आल्या आहेत. सोमवारी पहाटे एस.टी.ची गाडी भरधाव वेगाने चिपळूणहून रत्नागिरीकडे चालली असता अचानक चालकाला डुलकी लागली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. या डुलकीमध्ये भरधाव गाडी दुभाजकावर धडकून पलिकडच्या लेनवर गेली आणि समोरून येणाऱ्या कंटेनरला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले प्रवाशांना देखील दुखापत झाली आहे.