
गणपतीपुळे गावाने जपलीय ‘एक गाव एक गणपती’ परंपरा
परंपरेला शेकडो वर्षांचे ऐतिहासिक महत्व
रत्नागिरी :केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणपतीपुळे गावाने ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा गेले अनेक वर्षांपासून जपली आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला एक धार्मिक महत्त्व प्राप्त असून या गावांमध्ये स्वयंभू श्री गजाननाच्या आगमनानंतर या गावात घरोघरी गणपतीची पार्थिव मूर्ती न आणता मंदिरां मधील गणपतीच आपला आहे या भावनेने घरोघरी गणेशोत्सव साजरा न करता पाच दिवस श्रीं च्या मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जातो.
भाद्रपदी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा झाल्यानंतर या दिवशी धुतल्या वस्त्रांनी स्थानिक ग्रामस्थ तसेच येणाऱ्या भाविक पर्यटकांसह “श्रीं” च्या गाभाऱ्यामध्ये जाऊन “श्रीं” चे दर्शन घेतात. त्यामुळे हा दिवस ग्रामस्थांसह पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो पहाटेची पूजा झाल्यानंतर या दर्शनाला सुरुवात होते ती दुपारी १२ ; ३० पर्यंत सुरु असते. दुपारी १२ ;३० नंतर गाभाऱ्यात जाऊन घेता येणारे दर्शन बंद करण्यात येते व नेहमीप्रमाणेच दर्शन चालू राहते येथील ग्रामस्थ “श्रीं” च्या गाभाऱ्यातील फुलोरा व तीर्थ आणून त्याची घरामध्येउ पाटावर ठेवून विधिवत पूजा केली जाते. त्यादिवशी घराघरातून ‘श्री गजाननाला’ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो हि परंपरा शेकडो वर्षापासून अविरत सूरु आहे.
सायंकाळी ४:३० वाजता “श्रीं” ची हार फुलांनी सजवलेल्या पालखी मधून प्रदक्षिणा काढण्यात येते. यावेळी हजारो ग्रामस्थ व पर्यटक; भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थानिक ग्रामस्थ पहाटे पासूनच “श्रीं” च्या दर्शनासाठी रांगा लागून उभे असतात. यावेळी येथील निवेंडी; भंडारपुळे;नेवरे; मालगुंड; रीळ;उंडी आदी परिसरातील ग्रामस्थ यांच्या दर्शनासाठी येतात.
त्यावेळी सुमारे पाच दिवस श्रीं च्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; गणपतीपुळ्यातील वाडी-वाडी वरील भजन; महिलांच्या फुगड्या यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात
त्यानंतर वामन द्वादशीला येथील स्थानिक ग्रामस्थ व आलेल्या भाविक पर्यटकांना महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात येते व भाद्रपदी गणेशोत्सव कार्यक्रमाची सांगता होते येथील ग्रामस्थ स्वयंभू श्री गजाननाला आपल्या घरातील गणपती मानत असल्याने घरोघरी गणपती आणण्याची प्रथा येथे नाही मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.