पर्यटन विभागातर्फे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव
रत्नागिरी: राज्यातील गणेशोत्सवाचे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच आपल्या पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी, मुंबई, पुणे व पालघर येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवादरम्यान विविध राज्यांतील पर्यटनाशी निगडित भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी, पत्रकार व समाज माध्यम प्रभावाक, तसेच विदेशी वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करून त्यांना मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गणेश दर्शनाची थेट सुविधा, तसेच सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे श्री गणेशाच्या विविध स्वरूपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
महोत्सवांतर्गत ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राच्या पारंपरिक आदिवासी ‘वारली’ संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या वारली कलेची कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन, महाराष्ट्राच्या पारंपरिक कला आणि लोककला संस्कृतीचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आदी १० दिवसीय महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव हा केवळ मर्यादित आणि भव्यतेसाठीच नसून तो आपल्या महाराष्ट्राची कला व सांस्कृतिक वारसा तसेच येथील लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडवण्याचे माध्यम आहे. आम्ही आपली पारंपरिक कला व सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- गिरीश महाजन, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटक, उत्साही आणि सांस्कृतिक जाणकार यांना महाराष्ट्राच्या विशाल आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी होण्यास आमंत्रित करण्याचा आमचा उद्देश आहे. या १० दिवसीय सांस्कृतिक उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे.
- राधिका रस्तोगी, प्रधान सचिव, पर्यटन विभाग