
बाजारपेठा सजल्या, उत्साहात खरेदीला आरंभ
रत्नागिरीत ग्राहक सरसावले; आठवडा बाजारामुळे आज गर्दी वाढणार
रत्नागिरी, : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासीय आतुर झाले आहेत. बाप्पाचे आगमन फक्त दोन दिवसांवर आले असल्याने शहरातील बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी (ता. १६) आठवडा बाजार असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत तुफान गर्दी होणार हे अपेक्षित आहे. पावसाने चांगलीच उघडीप दिल्यामुळे बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. गणेशोत्सवाची खरेदीसाठी बाजारात हळुहळू गर्दी होऊ लागली आहे. गणपतीसाठी शोभिवंत वस्तू, सजावटीचे पडदे, हार, धूप-कापूर, अगरबत्ती, विद्युत रोषणाईचे साहित्य तसेच प्रसादाकरिता लाडू, मोदक, पेढे आणि फुटाणे खरेदीला वेग आला आहे.
महागाईची झळ पोहोचत असली तरी बाप्पासाठी कोणीही भक्त मागेपुढे न पाहता खरेदी करतो. वर्षभराने घरी येणाऱ्या बाप्पाचे आगमन यंदा अधिक श्रावण महिन्यामुळे एक महिना उशिरा होत आहे. १८ सप्टेंबरला हरितालिका पूजन असून, १९ ला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे खरेदीसाठी आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी घरगुती सजावट साहित्य आधीच घरी नेऊन ठेवले असून, दररोज रंगरंगोटी व सजावटीचे काम सुरू आहे.
बाजारात हजारो प्रकारच्या वस्तू आल्या आहेत. यामध्ये कृत्रिम झेंडू, गुलाब फुलांच्या माळा, तोरणे, झुंबर, गणेशमूर्तीसाठी किरीट, बाजूबंद, जास्वंदीची फुले उपलब्ध आहेत तसेच कापडी, कागदी, लाकडी फोल्डिंगची मखरेही आली आहेत. सिंहासन, मयुरासन, पतंगासन, गोल मंदिर व मोदकाच्या आकारातील मखरेही लक्ष्यवेधी आहेत.
गणेशोत्सवामुळे बाजाराला नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. श्रावण महिन्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी भाविक येत आहेत. दुकानदारांनी आपली दुकाने बाप्पासाठी लागणाऱ्या साहित्यांनी सज्ज ठेवली आहेत. ऑनलाइन खरेदीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत अनेक ग्राहक खरेदीला येत आहेत. पुढच्या दोन दिवसांत बाजारात विक्रमी गर्दी होईल.

