
डॉ. चोरगे यांच्या पारदर्शक कारभारामुळेच जिल्हा बँक यशोशिखरावर – अडसूळ
रत्नागिरी :जिल्हा बँकेत एक कवडीचाही भ्रष्टाचार झालेला दिसत नाही. मी खाणार नाही आणि कुणालाही खायला देणार नाही अशा कामकाजामुळेच याठिकाणी भ्रष्टाचाराला थारा नाही अशी भूमिकाच बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची असल्यानेच बँक यशोशिखरावर असल्याचे कौतुकोद्गार को. ऑपरेटिव्ह बँक एम्ल्पाईज युनियनचे अध्यक्ष व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी काढले.
को ऑपरेटिव्ह बँकस एम्प्लाईज युनियन व किसान बँक स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्यावतीने देशात उत्कृष्ट चेअरमन म्हणून पुरस्कार प्राप्त करणार्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सल्लागार नरेंद्र सावंत, जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी, कोषाध्यक्ष कुणाल दाभोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी खा. अडसूळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की डॉ. चोरगे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहेत. उत्तम शिक्षक, लेखक, संघटक असलेल्या डॉ. चोरगे यांनी मागील 17 वर्षात जिल्हा बँकेला मोठी उंची गाठून दिली आहे. त्यामुळेच देशातील 345 जिल्हा बँकांमधून सर्वोत्कृष्ट चेअरमनचा पुरस्कार त्यांना दिल्लीमध्ये देण्यात आला. बँकेत कामकाजात त्यांनी बेशिस्तीला थारा दिला नाही. चेअरमन पेक्षा ते शिक्षकच जास्त दिसून येतात असेे कौतुकही माजी खा. अडसूळ यांनी केले.
यावेळी सत्कारानंतर बोलताना डॉ. चोरगे म्हणाले की, 17 वर्षात कर्मचार्यांचे चांगले सहकार्य आपल्याला मिळाले. हा पुरस्कार मिळाला त्याचे खरे श्रेय हे समोर बसलेल्या कर्मचार्यांना आहे. कर्मचारी व संघटनेने आपल्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे बँकेला एका उंच जागी नेता आले. हा विश्वास कमी होणार नाही याची काळजी मी घेत राहीन असे डॉ. चोरगे यांनी सांगितले. यापुढे आता चार हजार कोटींच्या पुढे टप्पा गाठायचा असून, कर्मचारी संघटनेने ड्रेस कोडबाबतही विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणार्या आरती कांबळे व अपेक्षा सुतार या खो-खो खेळाडूंचाही कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमार बँकेच्या कबड्डी संघाने राज्यपातळीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलही त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमात सभासदांच्या गुणवत्ताप्राप्त मुलांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय चव्हाण यांना बँकेने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याबद्दल कर्मचार्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.