
आरटीओचे खासगी ट्रॅव्हल्ससाठी दरपत्रक जारी
रत्नागिरी: गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या कोकणवासीयांची खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून प्रवासी भाड्यात लूट होऊ नये, याकरिता नवी मुंबई आरटीओने दरपत्रक जारी केले असून नवी मुंबईतील थांब्यावर जादा भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
तसेच खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्कआकारणी करण्याचे सूचित केले आहे. निश्चित दरापेक्षाही जादा भाडे घेतल्यास कारवाई करण्यात येणार असून आरटीओकडून खासगी बसचालकांची तपासणीदेखील सुरू केली असल्याची माहिती आरटीओने दिली आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासीय रेल्वेने प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देतात, मात्र ऐनवेळी प्रवाशांना खासगी बसचा पर्याय वापरावा लागतो. याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. ही लूट थांबविण्यासाठी परिवहन कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांसाठी दर निश्चित केले आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई आरटीओ विभागानेदेखील वाशी ते कोकणात जाणाऱ्या २१ मार्गावरील बस थांब्यासाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. प्रवासभाडे निश्चित केलेल्या २१ मार्गांमध्ये महाड, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, राजापूर, देवगड, लांजा, सावंतवाडी, मालवण यासह कणकवली, गणपतीपुळे, गगनबावडा आदींचा समावेश आहे. तसेच बस थांब्यावर दर पत्रके लावून त्याचे पालन करण्याच्याही सूचना केल्या आहेत. यादरम्यान खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
आरटीओने निश्चित केलेले दर
वाशी ते महाड ४२८
वाशी ते खेड ५७८
वाशी ते चिपळूण ६२३
वाशी ते दापोली ५३३
वाशी ते श्रीवर्धन ४२८
वाशी ते संगमेश्वर ७२८
वाशी ते लांजा ८९३
वाशी ते राजापूर ९५३
वाशी ते रत्नागिरी ८४८
वाशी ते देवगड ११८५
वाशी ते गणपतीपुळे ९७५
वाशी ते कणकवली १११०