
भोंदूबाबाकडून लॅपटॉपसह मोटार जप्त; आणखी कारनामे उघडकीस येणार
खेड:- तालुक्यातील भरणे-गणेशनगर येथील एका महिलेस गुप्तधनाचे दाखवत जादूटोण्याचा प्रकार करणाऱ्या तीन तथाकथित संशयित भोंदूबाबांपैकी प्रसाद हरिभाऊ जाधव याने वापरलेला लॅपटॉपही येथील पोलिसांनी जप्त केला आहे. यामुळे भोंदूबाबाचे आणखी कारनामे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. भरणे- गणेशनगर येथे वास्तव्यास असलेल्या विठाबाई अण्णाप्पा पवार या महिलेस घरात असलेले गुप्तधन काढून कोट्यवधी रुपये मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधार प्रसाद हरीभाऊ जाधव याच्यासह विवेक यशवंत कदम, ओंकार विकास कदम हे तिघे पोलिस कोठडीत आहेत. यातील प्रसाद जाधवने फसवणुकीतील रक्कमेतून खरेदी केलेली ७ लाख रुपये किंमतीची मोटारही पोलिसांनी जप्त केली आहे. या पाठोपाठच त्याने पूजापाठ तंत्रमंत्र करण्यासाठी व कुंडली काढून भविष्य सांगण्यासाठी लॅपटॉपचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी लॅपटॉपही हस्तगत केला आहे. या लॅपटॉपमधील सॉफ्टवेअर कार्यान्वित होण्यासाठी लागणारी यूएसबी चीप हस्तगत करण्याच्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. यामुळे भोंदूबाबाचे आणखी कारनामे उजेडात येण्याची शक्यता आहे.