
टेम्पो दरीत कोसळून चालकासह दोघे जखमी
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो आंजणारी (ता. लांजा) घाटातील तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता घडला. टेम्पोचालक रफिक बादशहा लतिक आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. जीए ०४ टी 65 68) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता. टेम्पोत प्लास्टिक बॅरल आहेत. गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास आंजणारी घाटातील तीव्र उतार उतरत असताना हा आयशर टेम्पो आंजणारी घाटातील तीव्र वळणावर आंजणारी पुलाच्या वरील ठिकाणी उलटला. त्यानंतर काही काळ वाहतूक खंडित झाली होती. अपघातात चालक रफिक लतिक अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळतात लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टेम्पो चालकाला बाहेर काढण्यात आले.चालक रफिक लतिक याच्यासह क्लिनर सत्यवान संजीव मोरे हादेखील किरकोळ जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरीत दाखल करण्यात आले.