
आगाशे विद्यामंदिरात दहीहंडीचा जल्लोष
कृष्णगीतांवर नृत्ये, गोविंदाचा गजर
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात गुरुवारी बालदोस्तांनी गोविंदा रे गोपाळाचा गजर करत दोन थरांवर दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. इयत्ता पहिली ते चौथीच्या ५७५ विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंदोत्सवात भाग घेतला. राधाकृष्ण आणि पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी टिपरी नृत्य, गोविंदाच्या गीतांवर केला. महिला पालकांनी फेर धरला.
सुरवातीला श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी केले. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य सतीश दळी, दादा कदम यांच्यासह मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माता पालक संघाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची नृत्ये रंगली. गोविंदा रे गोपाळाच्या तालावर विविध नृत्य सादर झाली. यात पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला. सर्व शिक्षिका व माता पालकांनी यात भाग घेत कृष्णगीतांवर फेर धरला, टिपरी नृत्य सादर केला.
यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. नृत्य सुरू असताना पावसाचा शिडकावा झाला. त्यात मुले चिंब भिजली आणि दहीहंडीचा जल्लोष बालदोस्तांनी अनुभवला. तत्पूर्वी माता पालकांनी गोकुळाष्टमी, दहीहंडीनिमित्त विविध फळांचा प्रसाद तयार केला. पुरुष पालकांनी दहीहंडी बांधली. अशा प्रकारे शाळेच्या प्रत्येक घटकाच्या सहकार्याने दहीहंडी सण साजरा करण्यात आला.
