
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत झाडगावच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचे सुयश
रत्नागिरी: दरवर्षी शासनामार्फत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याच निमित्ताने याही वर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी येथील खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे.
सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या वर्षी सदर स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या 11 खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. यातील पाच विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर यश संपादन केले असून त्यातल्या चार विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे : 14 वर्षाखालील मुली : स्वरा शिंदे – तृतीय क्रमांक, 14 वर्षाखालील मुले – चेतन पाटील प्रथम क्रमांक, अभिनव जाधव – प्रथम क्रमांक, विकास पाटील प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुले : स्मित आग्रे – द्वितीय क्रमांक
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक स्वतः कुस्तीपटू असलेले श्री मारुती दगडू पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमार साळुंखे, सचिव सौ शुभांगी गावडे, आजीव सेवक तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, आजीव सेवक व विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत काटे यांच्याबरोबर हे संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे सर्व शिक्षक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक मारुती पाटील यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.