
आसूद येथे आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांग शिबिर संपन्न
दापोली : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आसूद, आंबवली खुर्द, सालदुरे व परिसरातील ग्रामपंचायतीसाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आर.एच. पी. फाऊंडेशन) दिव्यांग बांधवांसाठी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला गावातील दिव्यांगांचा चांगला प्रतिसाद लाभला.
आर. एच. पी. फाऊंडेशनचे सदस्य रवींद्र मुकनाक, संदीप भुवड, दिलीप नरवणकर, गुलाब खांबे आणि रवींद्र पोमेंडकर आणि आसूद ग्रुप ग्रामपंचायातीच्या यांच्या सहकार्याने आयोजित केले होते. या शिबिरास बहुसंख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. आसूद ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश कडू, उपसरपंच राकेश माने, ग्रामपंचायत सदस्य नासीर मुरुडकर, कर्मचारी दीपक मुरकर, गावकरी दिलीप आंब्रे व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच कल्पेश कडू यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आर. एच. पी. फाऊंडेशनच्या सदस्य प्रिया बेर्डे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांनी शासनाच्या विविध दिव्यांग योजनांनबद्दल इत्थंभूत माहिती दिली. दिव्यांगांना अपंग प्रमाणपत्र कसे काढले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ५ टक्के निधी कसा मिळवायचा याची माहिती दिली. दिव्यांग पेन्शन, दिव्यांग व्यवसाय कर्ज, मतिमंद दिव्यांगांसाठी पालकत्व करणे का आवश्यक आहे, याचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर दिव्यांगांच्या शंकांचे निरसरन केले. आरएचपी फाऊंडेशनच्या या शिबिराचा लाभ दिव्यांगाना मिळणार असल्याने दिव्यांगांनी फाउंडेशनचे आभार मानले.