सैतवडे परिसरात विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी आवाहन:अजिम चिकटे
पूर्वयादीतून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच लोकप्रतिनिधींची सारवासारव
रत्नागिरी ः जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असल्या तरी याबाबत अनेकांच्या मनात नाराजी तर काही ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे. अशातच सैतवडे परिसरात चक्क दोन ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या एकाही व्यक्तीला संधी न मिळाल्याने इच्छुकांकडून नव्हे तर चक्क जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, विशेष कार्यकारी अधिकाराच्या यादीत सैतवडे गावाला वगळल्याची बातमी प्रसिद्ध होताच जागृत सस्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र खुलासा करण्यास सुरूवात केली. सदर स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये अजिम चिकटे यांनी खुलासा करताना असे सांगितले की, आम्ही या गावांमधून इच्छुकांना अर्ज करण्यासाठी सांगितले होते. पण सैतवडे परिसरातून कोणीही इच्छुक नसल्याने या यादीमध्ये सैतवडे गावाचे नाव येऊ शकले नाही. दरम्यान अजुनही कोणी परिसरातील गावांमधून विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळण्यास इच्छुक असेल तर ती आपणासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे अशा इच्छुकांनी अर्ज केल्यास आमचा त्यांना निश्चित पाठिंबा राहील. तसेच आपणही त्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही अजिम चिकटे यांनी जाहीर केले. यामुळे परिसरातील अन्य सामाजिक कार्यकर्ते व जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.