
महिलेला ऑनलाईन 31 हजारांचा गंडा घालणार्याला अटक
रत्नागिरी:- सोशल मिडियाव्दारे महिलेशी ओळख वाढवून टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतात अशी बतावणी करत 30 हजार 720 रुपयांचा ऑनलाईन चुना लावणार्या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या.गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 28 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.फसवणूकीची ही घटना 20 मार्च ते 30 मे 2023 या कालावधीत घडली होती.
अनिल लक्ष्मण माने (39,मुळ.रा.नानेट,दापोली सध्या रा.गिरगाव,मुंबई) असे पोलिस कोठडी सुनाण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.तर त्याचा साथिदार हिमांशू लक्ष्मणसिंग जैन (मुळ रा.राजस्थान सध्या रा.बोरीवली,मुंबई) हा फरार आहे. याप्रकरणी गार्गी अपूर्व परुळेकर (29,रा.विर सावरकर पथ,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,संशयितांनी फिर्यादीशी व्हॉटसअॅप आणि टेलीग्राम अॅपवरुन चॅट करुन ओळख निर्माण केली.त्यानंतर माझ्याकडे एक टास्क आहे तो पूर्ण केलातर पैसे मिळतात. परंतू, प्रत्येक टास्कसाठी प्रथम काही रक्कम भरावी लागते असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याचे नाव,बँक खाते नंबर आयएफसी कोड अशी माहिती अज्ञात आरोपीला दिली.टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवॉर्ड मिळेल असे सांगून सुरुवातीला फिर्यादीने भरलेल्या रकमेवर टास्क पूर्ण केल्यावर रिवॉर्ड व भरलेली रक्कम आरोपीने परत केली.मात्र त्यानंतर फिर्यादींनी टास्कसाठी भरलेली 30 हजार 720 रुपये रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली.याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवी कायदा कलम 420,34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील एकाला अटक केली असून त्याचा साथिदार फरार आहे.