
‘आपले सरकार’ संकेतस्थळावर परवान्यांचे काम ठप्प
रत्नागिरी:- कृषी विभागामार्फत बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी परवाने प्रदान करण्यात येतात. यासाठी ‘आपले सरकार’ महाऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु या पोर्टलवर मागील दोन महिन्यांपासून कृषी विभागातील संबंधित अधिकार्याची डिजिटल स्वाक्षरी स्वीकारली जात नसल्याने नवीन परवान्यासह नूतनीकरणाचे काम ठप्प पडले आहे.ऑनलाईन प्रक्रियेमुळे परवाने वितरणात अतिशय चांगली कार्यवाही होत असल्याने याबाबत समाधान व्यक्त करण्यात येते होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून या प्रक्रियेला खीळ बसली आहे. नवीन परवान्यांसाठी आलेल्या मंजूर संबंधित अधिकार्याची डिजिटल स्वाक्षरी स्वीकारली जात नाही. त्यामुळे तब्बल साडेनऊ हजार परवान्यांचे वितरण रखडले आहे. परिणामी परवान्यांअभावी व्यवहार ठप्प झाले आहेत.
यासोबतच ई-पॉस मशीन लिंक करता येत नसल्याच्या विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागल्याने जिल्हास्तरावर परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांची यादीही उपलब्ध होत नाही.