
हातखंबा येथे उतारावर कंटेनरची ट्रकला धडक
संगमेश्वर : मुंबई – गोवा महामार्गावर हातखंबा गाव येथे दर्ग्याजवळील उतारावर शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने त्यात कोणीही जखमी नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून हातखंबा ते निवळी घाटादरम्यान कंटेनर अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे.
अपघाताबाबतची माहिती अशी- हा कंटेनर (यूके ०८ सीबी ०५८०) गोवा ते मुंबई व पुढे उत्तर प्रदेशला चालला होता. त्याच्यावर चालक अमरचंद महावीरप्रसाद जाट (३३) रा. राजस्थान हा होता. हातखंबा येथील दर्ग्याजवळ त्याचा वाहनवरील ताबा सुटला. त्यामुळे तो पुढे चाललेल्या ट्रकवर (एचआर ५५ एल ०९००) मागून आदळला. ट्रकचा चालक सुरेंद्र सरदार सिंग, (४५, रा. होशियारपूर पंजाब) हा होता. अपघातातील दोन्ही चालकांना कसलीही दुखापत झालेली नाही.