
दापोलीत चोरीप्रकरणी एकास अटक
दापोली :शहरातील भारत नगर येथील आयेशा महेक या इमारतीतील बंद फ्लॅट फोडून घरातील चांदीच्या दागिन्यासह मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी संशयित साकिब नासिर मुल्ला या चोरट्यास दापोली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फराह मिन्नत टेंटवलकर परिवारासह आयशा नामक इमारतीमध्ये राहतात. १२ ऑगस्ट रोजी मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने त्या आपल्या टेटवली येथील घरी गेल्या होत्या. तेथून १६ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील चांदीच्या वस्तू चोरीस गेल्याचे लक्षात आले. १७ ऑगस्ट रोजी दापोली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दापोली पोलिसांनी संशयित साकिब नासिर मुल्ला (वय २२, रा. रामराजे कॉलेजजवळ, दापोली) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यांने चोरीची कबुली दिली. संशयित आरोपीने दोन दिवसांपूर्वी दापोली बाजारपेठेतील घडलेल्या चोरीतही आपणच होतो, असे कबूल केल्याचे दापोली पोलिसांनी सांगितले.