
मंडणगड येथे दिवाणी न्यायालयाला मंजुरी
रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील मंडणगड येथे दिवाणी न्यायालयाला मंजुरी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हा तालुका रायगड लोकसभा मतदारसंघात येतो आणि विधानसभेला तो दापोलीला जोडण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मंडणगडला दिवाणी न्यायालय मंजूर करण्यात आलेले आहे. यासोबतच येत्या गौरी गणपतीला राज्यातील जनतेला पुन्हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा त्यात समावेश असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड हा तालुका विधानसभेला दापोली मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे, तर लोकसभेला तो रायगड मतदारसंघात आहे. दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम आमदार आहेत, तर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे करतात. त्यामुळे युती सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या योगेश कदम यांच्या मदारसंघासाठी मोठा निर्णय घेतला आहे.