मिरकरवाड्यातील मुस्लिमांशी ऋणानुबंधामुळेच शैक्षणिक साहित्य वाटप- माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी : माझे वडिल कै. यशवंतराव मच्छीमार व्यवसाय करत होते. त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा या व्यवसायात उतरलो. त्यामुळेच मिरकरवाडा येथील मच्छीमार, मुस्लीम मित्रमंडळींशी अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळेच येथील डॉ. अब्दुल कलाम विद्यालयातील (उर्दू शाळा क्र. १०) मुलांकरिता शैक्षणिक साहित्य देणे ही मागणी पूर्ण करत आहोत. शाळेच्या काही अडीअडचणी असतील, त्या नक्की सोडवू. विद्यार्थी, महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आहेत, हे पाहून आनंद होत आहे, असे प्रतिपादन दि यश फाउंडेशनचे विश्वस्त, माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केले.
मिरकरवाडा उर्दू शाळेत भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष रफिक मुकादम, उपाध्यक्ष मन्सूर मुकादम यांनी केलेल्या मागणीनुसार शैक्षणिक साहित्याचे वितरण माजी आमदार बाळ माने, दि यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, मिहीर माने, विराज माने यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कंपासपेटी, रंगपेटी, वह्या, पाण्याची बाटली आदींचा समावेश होता. याप्रसंगी मिरकरवाडा नगरपालिका शाळेतील २०० विद्यार्थी, त्यांचे पालक, मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ मच्छीमार नेते निसारभाई दर्वे म्हणाले, माझा पक्ष व बाळासाहेबांचा पक्ष वेगवेगळा आहे. परंतु आम्ही चांगले मित्र आहोत. त्यांच्या वडिलांपासून चांगले संबंध आहेत. मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. त्यांच्यामुळेच काही कार्यकर्त्यांना मच्छीमार संघाचे अध्यक्षपद व अन्य पदे मिळाली आहेत. आमच्या कोणत्याही समस्या असल्या तरी आम्ही त्यांना संपर्क साधतो व ते आमची कामे करत आहेत.
या वेळी बाबामियॉं मुकादम, इम्तियाज मुकादम, रफिक मुकादम, मन्सूर मुकादम, शोएब खान, इंतखाब खान, मुख्याध्यापिका श्रीमती नासीरा मोकाशी, माईदा मुल्ला, जीनत दलाल, नसीरा वस्ता, मुख्तार म्हैसकर, सबरिना वस्ता, परवीन सरदार, तरन्नूम सोलकर, सुवात भाटकर आदी उपस्थित होते. दि यश फाउंडेशनचे गुरु शिवलकर, विक्रम मयेकर, प्रशांत ढेपसे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.