
रत्नागिरी कॅरम लीग सिझन – ६ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेचे १३ ऑगस्टला आयोजन
रत्नागिरी:- उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित राज्य स्तरीय आमंत्रितांची रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ रविवार दि. १३ रोजी सायंकाळी ५ वाजता देसाई बँक्वेट हॉल, हॉटेल विवेकच्या मागे, रत्नागिरी येथे प्रारंभ होत आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत व्हिक्टोरियन्स, कॅरम मास्टर्स, सत्यशोधक स्ट्रायकर्स, शिवगर्जना लायन्स, कॅरम लव्हर्स, जैन सुप्रिमोस, मुंबई मास्ट्रोस आणि यंगस्टर्स असे एकंदर ८ संघ खेळणार असून यात महाराष्ट्रातील तब्बल ४० नामांकित खेळाडूंचा समावेश असेल. भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, इन्फिगो आय केअर, ओ एन जी सी व पितांबरी यांचा पुरस्कार लाभलेल्या या लीगमध्ये विश्व् विजेते संदीप दिवे, प्रशांत मोरे, योगेश परदेशी तसेच आंतर राष्ट्रीय कॅरमपटू महम्मद घुफ्रान, संदीप देवरुखकर, रियाझ अकबर अली, अभिजित त्रिपनकर प्रकाश गायकवाड, अनिल मुंढे,अशोक गौर, दिलेश खेडेकर, संजय मांडे यांचा व्यतिरिक्त माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडेचा सहभाग असेल.
तर पहिल्यांदाच या लीगमध्ये महिलांचा समावेश केला असल्याने काजल कुमारी, संगीता चांदोरकर, ऐशा साजिद खान व आकांक्षा कदम या खेळाडूंचा खेळ रत्नागिरी वासियांना बघायला मिळणार आहे. साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाऱ्या या लीगमध्ये १ एकेरी, १ दुहेरी व १ मिश्र दुहेरी असे सामने खेळविण्यात येणार असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू रियाझ अकबर अली, अभिषेक चव्हाण व आकांक्षा कदम यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच रत्नागिरी व रायगड जिल्याचे पालकमंत्री उदय सामंत गेली ५ वर्षे सातत्याने कॅरम या खेळाला प्राधान्य देऊन या स्पर्धेला सर्वतोपरी मदत करत आहेत.
स्पर्धेचे उदघाटन ना. सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱी, रत्नागिरी हे भूषविणार आहेत. याप्रसंगी किरण सामंत ( उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ), धनंजय कुलकर्णी ( पोलीस अधीक्षक ), कीर्तिकिरण पुजार ( मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद ) महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे जितेंद्र शहा ( अध्यक्ष ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.