
राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुदेश मयेकर यांची प्रदेशाध्यक्षांकडून निवड
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदावर सुदेश मयेकर यांची प्रदेशाध्यक्षांकडून निवड जाहीर झाली आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुदेश मयेकर याना निवडीचे पत्र दिले आहे. राज्यस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार शेखर निकम, तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे अजितदादा पवार यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर शरद पवार यांच्या मुळ राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. आता या पदावर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदेश मयेकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदासाठी सुदेश मयेकर आणि कुमार शेट्ये यांची नावे जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती. त्यातून सुदेश मयेकर यांची निवड घोषित केली आहे. सुदेश मयेकर यांनी रत्नागिरीचे नगरसेवक म्हणून अनेकवेळा विजय संपादन करून आपल्या विकास कामांची चुणूक वारंवार दाखवून दिली आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात त्यांनी निवडणूकही लढवली होती.