
लाल मातीतील शेतात रमले छोटे शेतकरी
खानू येथे संजीवन गुरूकुलचा भातलावणी उपक्रम
रत्नागिरी,: पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलमधील इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांनी खानू-पाली येथील प्रगत शेतकरी प्रकाश खांडेकर यांच्या शेतात भातलावणी उपक्रम राबविताना शेती कामाचा आनंद लुटला. कोकणच्या लाल मातीत माखलेल्या छोटया मुलांनी शेती कामाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
गुरूकुलमध्ये दरवर्षी भातलावणी उपक्रम इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. यावर्षी खानू-पाली येथील प्रगत शेतकरी प्रकाश खांडेकर यांच्या शेतात भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामध्ये खत पेरणे, पॉवर टिलर मशीन हाताळून नागरणी व भातलावणी केली. यावेळी विद्यार्थ्यासोबत ज्येष्ठ शिक्षक दिनेश मोहिते, सुनिल पवार, वर्गशिक्षिका ऋतुजा वझे, सौ. वैभवी भावे उपस्थित होते. हा उपक्रम गुरूकुलचे प्रबधंक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.