
नोकऱ्या निर्माण करणारे विद्यार्थी मत्स्य महाविद्यालय घडवेल
रत्नागिरी : मत्स्य पदवीधारकांनी व्यवसायभिमुख शिक्षण प्राप्त करून आपला व्यवसाय उभारावा आणि त्यातून इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे नोकरी मिळवण्यापेक्षा नवीन नोकऱ्या निर्माण करणारे विद्यार्थी घडले तरच हे व्यावसायिक शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
मत्स्य महाविद्यालयाच्या ४३व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मत्स्य व्यावसायिक आणि मत्स्य शेतकऱ्यांना उपयुक्त संशोधन करून त्यांच्या अन्नसुरक्षा, रोजगार सुरक्षेसाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा डॉ. भावे यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षभरात शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण, सामाजिक, कला, क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कुलगुरू डॉ. भावे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. महाविद्यालयातील नऊ विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त व मत्स्यविकास अधिकारी पदाच्या परीक्षेत महाविद्यालयाचे अनुक्रमे ४२ व ३६ विद्यार्थी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला सहसंचालक केंद्रीय मात्स्यिकी शिक्षणसंस्थेचे डॉ. एन. पी. साहू, गोवा येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्रीपादा ए. आर., महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे उपस्थित होते.
प्रस्तावना सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिनगारे यांनी केली.

व्याख्यानमालेच्या तांत्रिक सत्रात डॉ. साहू यांनी जागतिक अन्नसुरक्षेसाठी मत्स्यसंवर्धनातील संधी तर डॉ. श्रीपादा ए. आर. यांनी समुद्री घोडे ः किनारी सागरी जैवविविधतेसाठी प्रमुख प्रजाती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आसिफ पागारकर व डॉ. केतन चौधरी यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुहास वासावे यांनी तर आभार डॉ. सुरेश नाईक यांनी मानले. यावेळी डॉ. मनोहर चांडगे, डॉ. विजय निंबाळकर, माजी प्राचार्य डॉ. अजिज पठाण, डॉ. नितीन सावंत, डॉ. विजय दळवी, डॉ. किरण मालशे, डॉ. आनंद हणमंते, डॉ. अनिल पावसे, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. स्वप्नजा मोहिते, डॉ. मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.