
पत्नीच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून केली हत्या
सहा वर्षीय निष्पाप बाळाचादेखील घेतला बळी
लांजा:- स्वतःच्या सहा वर्षीय निष्पाप बाळाचा बळी घेत बायकोवर देखील कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे घडली आहे. या घटनेनंतर सैतानाला लाजवेल असे कृत्य करणारा तरुण घटनेनंतर बेपत्ता झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक हत्याकांडाने कोट गावासह लांजा तालुका देखील हादरून गेला आहे. मात्र या हत्याकांडाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथील रहिवासी असलेला संदेश रघुनाथ चांदवडे (वय ३५) हा आपली आई आशा चांदवडे , पत्नी सोनाली चांदवडे (वय २५), मुलगा प्रणव चांदवडे (वय ६) आणि दुसरा मुलगा पियुष चांदवडे (वय ३) यांच्यासह राहत होता संदेश चांदवडे हा आपल्या मामाच्या घरात म्हणजेच प्रकाश शांताराम पाष्टे यांच्या घरात राहत होता .पाष्टे यांचे सर्व कुटुंब हे मुंबईत राहतात तर संदेश चांदवडेकर हा आपली पत्नी आई आणि मुलांसह मामाच्या घरात कोट पाष्टेवाडी येथे
राहतो. सोनाली चांदवडे हिचे माहेर सांगली येथील आहे.
संदेश चांदवडे हा वीज मीटर रिडींग आणि बिले देण्याचे काम करायचा. पत्नी आणि दोन मुलांसह त्याचा सुखाचा संसार सुरू होता. तसेच तो स्वभावाने शांत होता. कुठल्याही प्रकारचे त्याला व्यसन देखील नव्हते, असे शेजारी पाजाऱ्यांकडून सांगण्यात आले .आजूबाजूच्या लोकांशी देखील त्याचे फारसे येणे जाणे नसायचे.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास संदेश याने आपल्या सहा वर्षीय बालक प्रणव या निष्पाप बाळाचा बळी घेतला. त्यानंतर झालेल्या वादातून त्याने पत्नी सोनाली हिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये ती जागीच गतप्राण झाली. ही घटना घराच्या पाठीमागे घडली. या घटनेनंतर संदेश
त्याने पलायन केले .गुरुवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान संदेश याची आई आशा उठली. मात्र घरात संदेश व सुन सोनाली न दिसल्याने हाका मारत घराच्या पाठीमागे गेली असता सोनाली ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. सून सोनालीचा मृतदेह पाहिला आणि तीने हंबरडा फोडला. तिच्या जोर जोरात रडण्याने शेजारीपाजारी जमा झाले .घरालगत असलेले विजय पाष्टे आणि संतोष राजये हे प्रथम तिच्या घरी गेले यावेळी ज्यांनी ही भयानक घटना पाहिली या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळवण्यात आली आणि त्यानंतर लांजा पोलिसांना या हत्याकांडाची माहिती देण्यात आली.
या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे सर्व व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. पत्नी आणि मुलाच्या हत्याकांडाने संपूर्ण कोट गावासह लांजा तालुका हादरून गेला आहे .मात्र या हत्याकांडामागे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.संदेश याची पत्नी आठ दिवसांपूर्वी घर सोडून गेली होती अशी देखील घटनास्थळी चर्चा सुरू होती. आणि काहीतरी नाजूक प्रकरणातूनच ही हत्या झाल्याची देखील संशय या ठिकाणी पोलिसांनी व्यक्त केला आहे
मात्र ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली? स्वभावाने शांत असलेल्या संदेश इतका क्रुर आणि हैवान का झाला? आपल्या निष्पाप बाळाचा बळी का घेतला? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. संदेश पोलिसांच्या हाती लागल्यावर या प्रश्नांची उकल होणार आहे. मात्र या घटनेमुळे लांजा तालुका हादरून गेला आहे.