
मोहिनी मुरारी मयेकर कला,वाणिज्य महाविद्यालयाच्या 14 व्या वर्धापन दिनी साजरा
महिला विकास कक्षाच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन ,विक्री चे स्टॉल ठरले मोठे आकर्षण
मार्गदर्शक प्राध्यापकांचे सर्वत्र कौतुक
रत्नागिरी :येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा 14 वा वर्धापन दिन नुकताच रविवार दी. 30 रोजी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात सक्षमपणे कार्यरत असणाऱ्या महिला विकास कक्षाकडून करण्यात व मांडण्यात आलेले हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चे स्टॉल हे वर्धापन दिनाचे मोठे आकर्षण ठरले .
महिला विकास कक्षाकडून विद्यार्थिंनिंच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हस्तकला वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते.पुढील जीवनात त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते.
सदरच्या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी स्वतः बनविलेले लोकरीचे रुमाल, तोरणे , मायक्रोमचे झुले, आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, वॉल हँगर, मोती – मण्यांची तोरणे , रेशीम धाग्याच्या बांगड्या, ब्रेसलेट, हेअर ब्रोच ,रुचकर असे टिकाऊ खाद्यपदार्थ आणि विशेष आकर्षक अशा विविध प्रकारच्या राख्या बनवून त्यांची मांडणी करण्यात आली होती. वस्तू तयार केल्यावर त्यांची किंमत निश्चिती , जाहिरात आणि विक्री कशी करावी याचे परिपूर्ण मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये आणि महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. कविता जाधव यांच्याकडून केले जाते.
सदरच्या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर , उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषिकेश मयेकर, डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या पत्नी दीप्ती मयेकर आदी उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक, पालकवर्ग यांनी विशेष कौतुक केले.तसेच भविष्यातील यशस्वी उद्योजिका निर्माण करण्याचे काम हा विभाग करत असल्याचे गौरवोउद्गार काढत आपली प्रतिक्रिया दर्शविली.
परिसरातून या उपक्रमाचे खुप कौतुक करण्यात येत आहे.