
संभाजी भिडे यांचा चिपळूण दौरा रद्द
चिपळूण:देशातील राष्ट्रपुरुष संतांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे हे गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये येणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्याला राजकीय व सामाजिक संस्थांचा विरोध वाढला असून, ते अधिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भिडे यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी बुधवारी उशिरापर्यंत परवानगी दिली नव्हती. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भिडे समर्थकांकडून सांगण्यात आली.
गेले अनेक दिवस संभाजी भिडे यांची वेगवेगळी वक्तव्ये वादग्रस्त केली आहेत. त्यामुळे चिपळुणातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी त्यांच्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. यामध्ये चिपळूण तालुका कॉंग्रेस, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच यांचा समावेश आहे. त्यांनी बुधवारी पुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देत भिडे यांच्या दौऱ्यासह कार्यक्रमाला पोलिसांनी परवागी न देण्याची मागणी केली. यावेळी राजमाने यांनी अजूनही संबंधित कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. तर धारकरी शिवप्रतिष्ठानच्या चिपळूण शाखेने गुरुवारी चितळे मंगल कार्यालयात होणारा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला असल्याचे समजते.