रेल्वे कर्मचारी महिलेची पर्स चोरून पळणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या
लांजा:- रेल्वेने मडगाव ते रत्नागिरी असा प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचारी महिलेची पर्स चोरून पळून जाणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी शिताफीने पकडले. उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या या चोरट्याला लांजा पोलिसांच्या हवाली आले आहे.
रेल्वे कर्मचारी अस्मिता तुकाराम सावंत (४०, रा. खेड रेल्वे स्टेशनजवळ) या मंगलोर सीएसटी या रेल्वेने मडगाव ते रत्नागिरी असा प्रवास करीत होत्या. त्यांच्या डब्यातून अंकित रामनिवास गौतम (२३, रा. बहाणपूर, ता. जि. हाथरस, उत्तर प्रदेश) हाही प्रवास करीत होता. सोमवारी पहाटे ३ ते ३:३० वाजण्याच्या सुमारास रेल्वे आडवली येथे क्रॉसिंगसाठी थांबली असता, अंकित गौतम हा अस्मिता सावंत यांची पर्स चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. सावंत यांच्या लगेचच ते लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने रेल्वे पोलिस त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी अंकितला पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले.
अंकित गौतमवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई अधिक तपास करत आहे.