
महसूल दिनानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट जिल्ह्यात महसूल सप्ताह: जिल्हाधिकारी
रत्नागिरी :1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्या वेळी व वेळापत्रानुसार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. महसूल व वन विभाग 25 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
या सप्ताहात 1ऑगस्ट रोजी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करणे, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 खालील प्रकरणे तलाठ्यांमार्फत ई-हक्क पोर्टलवर सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवून तहसीलदारांकडे पाठविणे. गाव तेथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविणे. 2 ऑगस्ट रोजी युवा संवादमध्ये 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे याबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढणे. प्रमाणपत्र, दाखल्यांबाबतची माहिती, आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहितीपत्रक प्रसिध्द करणे. 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा यात नुकसानीबाबत पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणे. 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद मध्ये महसूल अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणे.
5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करणे. 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभात सप्ताहातील विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती, विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन सांगता समारंभ आयोजित करणे, असे उपक्रम करण्यात येणार आहेत.