
सेवानिवृत्त विमा अधिकारी, आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हिलचेअर, कमोड चेअर, वॉकरची मदत
रत्नागिरी : येथील रिक्षाचालकाला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर आलेले आजारपण यामुळे घरातच राहण्याची वेळ आली. या दिव्यांग व्यक्तीने रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या मदतीने या दिव्यांगाला सेवानिवृत्त विमा अधिकाऱ्यांनी व्हिलचेअर, कमोड चेअर व वॉकरची मदत नुकतीच केली. यामुळे या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
प्रफुल्ल पांडुरंग बीडु (वय ६१, रा. वायंगणी, रत्नागिरी) हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करायचे. २०१३ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यानंतर दोन्ही डोळ्यांवर परिणाम होऊन अंधत्व आणि रक्तदाब, मधुमेहाचा त्रास चालू झाला. तेव्हापासून ते घरीच असतात. त्यांना पत्नी प्रेरणा बीडु या गृहिणी असून मुलगा प्रतिक कामानिमित्त बायको, मुलासह बाहेरगावी असतो. मुलगी प्रतिक्षाचे लग्न झाले आहे. २०१८ साली प्रफुल्ल बीडु यांची भेट रत्नगिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याशी झाला व ते बीडु प्रवाहात आले.
संस्थेने मदत, सहकार्य केले व त्यांना ग्रामपंचायतचा ५ टक्के निधी, संजय गांधी पेन्शन मिळवून दिली. त्यानंतर ते घरी राहुन दिव्यांगांसाठी काम करू लागले. त्यात एकदा त्यांच्या पायाला काटा रुतला व जखम होऊन पायाचा अंगठा काढावा लागला. पुन्हा तिथेच मार लागला व त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने पायाला गॅंगरिन झाले व जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले. परंतु पोटरीपासून पाय काढावा लागला. त्यामुळे त्यांना फिरणे मुश्किल झाले व घरातच बिछान्यावरच झोपून राहावे लागत आहे. घरी पत्नी आणि मुलगा, सून त्यांची सेवा करत आहेत.
प्रफुल्ल बीडु यांनी आरएचपी फाउंडेशनकडे कमोडचेअर, वॉकर आणि व्हीलचेअरची मागणी केली होती. संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांना एलआयसीच्या सेवानिवृत्त अधिकारी मनाली मिलिंद देसाई यांनी दिव्यांगांसाठी मदत करण्याची इच्छा बोलुन दाखविली होती. त्याप्रमाणे समीर नाकाडे यांनी देसाई यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी बीडु यांना व्हिलचेअर, कमोडचेअर आणि वॉकरची मदत केली. यामुळे बीडु कुटुंबियांनी मनाली देसाई व आरएचपी फाउंडेशनचे आभार मानले.