
प्राणायाम, आरोग्य शिबिराला उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा येथील चॅप्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने खास उद्योजकांसाठी पार पडलेल्या प्राणायाम, आहार, विहार आणि आरोग्य शिबिराला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
धकाधकीच्या काळात मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक ऊर्जा टिकवणे किती गरजेचे आहे, हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मानसी महागावकर यांनी सहज सोप्या शब्दांत सांगितले. प्राणायामामधील नाडीशुद्धी प्राणायाम, भस्त्रिका, ध्यान यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी ते उपस्थितांकडून करवून घेतले. याच पद्धतीने दररोज पाऊण ते एक तास प्राणायाम आणि ध्यान केल्यास आपल्या ऊर्जेमध्ये प्रचंड परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल जीवन अधिक उत्साही आणि निरोगी होते, असे त्यांनी सांगितले. प्राणायाम आणि ध्यान करताना बारीकसारीक गोष्टींची कशी काळजी घेतली पाहिजे, याचे उत्तम मागदर्शन त्यांनी केले. सामूहिक ध्यान केल्याने इच्छाशक्ती अधिक दृढ होते, असेही त्या म्हणाल्या.
सॅटर्डे क्लबचे कोकण रिजन हेड राम कोळवणकर, डेप्युटी रिजन हेड तुषार आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा उपयोग उद्योजक आरोग्य सुदृढ करण्यासाठी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.