
जिल्हयाची मतदार यादी शुध्दीकरणासाठी
प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे
:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी :- मतदार यादीच्या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देण्याच्या उपक्रमाचा जिल्हयातील सर्व नागरिकांनी लाभ घेवून रत्नागिरी जिल्हयाची मतदार यादीच्या शुध्दीकरणासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
ईव्हीएम मशिन प्रथमस्तरीय तपासणी विषयी आढावा बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आवश्यक सूचना करुन आवाहन केले.
ते म्हणाले मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून दिनांक 01/01/2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रमाचे पुनरिक्षण-पूर्व उपक्रम (Pre-Revision Activities) व पुनरिक्षण उपक्रम (Revision Activities) दोन भाग करण्यात आलेले आहेत. यापैकी पुनरिक्षण पूर्व उपक्रमांमध्ये खालील कामकाज प्रामुख्याने करण्यात येणार आहे.
21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्हयातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधित कुटुंबप्रमुखांकडून करणार आहेत. यावेळी BLO मार्फत पुढील बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.
नोंदणी न केलेले पात्र मतदार (दिनांक 01/10/2023 रोजी पात्र) संभाव्य मतदार (दिनांक 01/01/2024 रोजी पात्र). संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र – दिनांक 01/04/2024 व दिनांक 01/07/2024 तसेच दिनांक 01/10/2024 या अर्हता दिनांकावर पात्र मतदार). एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार. मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती. तसेच पुनरिक्षण उपक्रमानुसार 17 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार यादीची प्रारुप प्रसिध्दी करण्यात येणार आहे व त्यानंतर 17 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे व त्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत निकाली काढून 05 जानेवारी 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाकडून सन 2023 पासून दरवर्षी 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै व
01 ऑक्टोबर अशा चार अर्हता दिनांकानुसार वा त्यापूर्वी 18 वर्ष पूर्ण होणा-या नागरिकांना मतदार यादीमध्ये आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.