
बुद्ध प्रतिमा विटंबना प्रकरणी संशयिताला अटक
चिपळूण:- चिपळूण शहरालगतच्या गुहागर पर्यायी मार्गावरील बौद्ध लेण्यांमधील तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेची अज्ञाताकडून तोडफोड करून विटंबना केल्याची खळबळजनक घटना महिनाभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केली आहे.
या बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी बावशेवाडी येथील बौद्ध बांधवांनी भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा प्रतिष्ठापित केली होती. या प्रतिमेची अज्ञाताकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बौद्ध समाजबांधवांनी तेथे मोठी गर्दी केली. संताप व्यक्त करत विटंबना करणाऱ्यास तत्काळ अटक करण्याच्या मागणीने जोर धरला होता. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.