
रत्नागिरी शहरात रिक्षा चालकाचे महिलेसोबत असभ्य वर्तन
रत्नागिरी :शहरात आणखी एक रिक्षा चालकाने प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार घडला. महिलेने खंबीर भुमिका घेऊन नातेवाईकांना बोलावल्यानंतर नातेवाईकासह जमावाने रिक्षाचालकाची जोरदार धुलाई केली. शहरातील चवंडेवठार येथील हा रिक्षाचालक असून पोलिसांनी त्याला चांगलाच दम भरून त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. माळनाका येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला.
रिक्षाचालकाने एका प्रवासी तरूणीशी अश्लिल वर्तन केल्यानंतर त्या तरूणीने धाडस दाखवत झालेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे संवेदनशील असलेल्या पोलिस खात्याने तत्काळ त्याची दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेज आणि मुलीने दिलेल्या माहितीवरून रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. अनेक महिला संघटनांनी त्या रिक्षा व्यवसायिकावर कडक कारवाईची मागणी केली. रिक्षा चालकाच्या या हिन कृत्याने त्याची समाजात प्रचंड बदनामी झाली. त्याने असे अनेक प्रकार केल्याचे नंतर उघड झाले. या बदनामीमुळे संबंधित रिक्षाचालकाने आत्महत्या केली. या सर्व प्रकाराने रिक्षा चालकांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला होता. परंतु रिक्षा संघटनांनीही या घटनेचा निषेध केला. हा प्रकार विस्मरणात जात असताना रविवारी आणखी एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेशी अश्लिल प्रकार केल्याचे उघड झाले.
महिला प्रवासी मारूती मंदिरच्या दिशेने जात असताना संबंधित रिक्षा चालकाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी विचारणा केली. यावरून महिला आणि रिक्षाचालकामध्ये जोरात वाद झाला. महिलेने तत्काळ आपल्या नातेवाईकाल फोन करून बोलवून घेतले. हा प्रकार सांगितल्यानतंर संबंधित नातेवाईकाने माळनाका येथे त्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. काही क्षणात अनेक जण गोळा झाले. महिलेशी अश्लिल वर्तन केल्याच्या सांगितल्यानतंर जमावानेही त्याची यथेच्छ धुलाई केली. जमाव झाल्यामुळे तेथे वाहतुक कोंडी झाली. पोलिसांपर्यंत हा विषय गेल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल होऊन रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात त्या रिक्षा चालकाविरुद्द अदखलपात्र गुन्हा दखल केला आहे.