
आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांग मुलीस व्हिलचेअर
रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) कर्दे (ता. दापोली) येथील दिव्यांग मुलीस व्हिलचेअर मदत म्हणून सुपुर्द करण्यात आली. यामुळे या मुलीसह पालकांनी समाधान व्यक्त केले. आता घरातल्या घरात व्हिलचेअरवरून फिरू शकणार आहे व बऱ्याच वर्षांनी बाहेरचे जग पाहणार आहे.
हेमांगी सुनिल नरवणकर (वय २५) ही कर्दे येथील युवती जन्मत: सर्वसामान्य मुलींप्रमाणेहोती. इयत्ता पहिलीपर्यंत ती शाळेत व्यवस्थित जात होती. पण सहा-सात वर्षानंतर हळुहळू तीचे बोलणे, चालणे कमी कमी होत गेले. कारण कळले नाही, पण ती मतिमंदाप्रमाणे वागू लागली. त्यामुळे आई-वडिलही चिंतेत होते. लहान मुलांप्रमाणे आंघोळ घालणे, कपडे बदलणे, जेवण भरवणे अशा सर्वच गोष्टी समजून करून घ्याव्या लागतात.
शाळेत नेऊन बसवले तरी ती बसू शकत नव्हती. लहान असताना उचलून नेणे शक्य होतं. पण जसजसं वय वाढत गेले तसं वजनही वाढत गेलं. आईवडीलांना तिला उचलून शाळेत किंवा बाहेर नेणे अशक्य होऊ लागले. ती घरातल्या घरात दोन्ही बाजुला दोघांनी धरून हळुहळू चालवतात. पण पाय वाकडा पडत असल्याने हेमांगी फार अंतर चालू शकत नाही. आई सुजाता नरवणकर या मुलीकडे लक्ष देत घरीच कपडे शिवायचे काम करतात. वडील सुनिल नरवणकर मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात.
आरएचपी फाउंडेशनचे एक शिबीर हर्णै गावात झाले होते. तिथे हेमांगीचे पालक तिला घेऊन आले होते. तिथे शिबिरामध्ये हेमांगीची सर्व माहिती आरएचपीचे अध्यक्ष सादीक नाकाडे आणि सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे यांनी घेतली. संस्थेतर्फे हेमांगीच्या सोईची व्हीलचेअर हेमांगीला दिली. व्हीलचेअरमुळे हेमांगीला आता उचलून नेण्याचा पालकांचा त्रास कमी झाला आहे. आधी घरातल्या घरातही चालवायला दोन-दोन माणसं लागायची आता तो त्रासही बंद झाला. हेमांगीला बाहेर घेऊन जाणे आता सहज शक्य झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. हेमांगीलाही व्हीलचेअरवरुन फिरणे आवडू लागले आहे.