
माळ्यावरुन पडून जखमी
झालेल्या मुलीचा मृत्यू
राजापूर:घराच्या पहिल्या माळ्यावरून खाली पडून जखमी झालेल्या सहा वर्षांच्या मुलीचा ३६ दिवसांनी मुंबईत उपचारादरम्यान २६ जून रोजी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुतवी प्रशांत नाचणेकर ( मूळ रा. अणसुरे, भराडीनवाडी, राजापूर, सध्या रा. दिवा पूर्व , ठाणे ) असे तिचे नाव आहे. ही घटना २२ मे २०२३ रोजी घडली होती. रुतवी नाचणेकर ही मे महिन्याच्या सुटीत तालुक्यातील अणसुरे येथे गावी आली होती. घरातील पहिल्या माळ्यावरून ती १३ ते १४ फूट खाली पडून जखमी झाली होती. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली होती. तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला २४ मे २०२३ रोजी मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असतानाच २६ जून २०२३ रोजी दुपारी तिचा मृत्यू झाला. याबाबत १४ जुलै रोजी नाटे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास नाटे पोलिस करत आहेत.