
सावर्डे खोतवाडीसाठी ८४ कोटींचे धरण
२१३ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
सावर्डे:- जलसंधारण विभागाकडून सावर्डे येथे ३४०० दलघन मीटर साठवण क्षमतेचे धरण उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २५ हेक्टर जागा संपादित करावी लागणार असून, या धरणाच्या माध्यमातून २१३ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.
तसेच सावर्डे व कोंडमळा येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्नही निकालात निघणार आहे. भूसंपादनासह या धरणाचे अंदाजपत्रक सुमारे ८४ कोटी असून, हा प्रस्ताव विभागीय कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. याला जलसंधारण विभागानेही दुजोरा दिला आहे.
सावर्डे येथील धरण २५ हेक्टरमध्ये होणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सावर्डे येथे धरणाची ग्रामस्थांची मागणी होती. आमदार शेखर निकम यांनी जलसंधारण विभागाला प्रस्ताव करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही सुरू होती.
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या सावर्डे गाव शहराप्रमाणे विकसित होत आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांत सह्याद्री शिक्षणसंस्था, डेरवण रुग्णालय, मेडिकल कॉलेज, सह्याद्री व्यवसाय अभिमुख महाविद्यालय इमारत विकासक, आठवडा बाजार, हॉटेल व्यावसायिक वाढले आहेत.
भविष्याचा विचार करता धरण प्रकल्प झाला तर लागणारी पाण्याची गरज पुरवणे शक्य आहे. त्यासाठी आमदार निकम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने धरण प्रकल्प प्रस्तावित केला आहे. १९७५च्या दशकात सावर्डे येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.
स्व. गोविंदराव निकम यांनी खासदार झाल्यानंतर इंडो-जर्मन प्रकल्पाच्या धर्तीवर नळपाणी योजना मंजूर करून आणली. त्यानंतर राष्टीय पेयजल, जलस्वराज्य, सध्याची १७ कोटींची जलजीवन योजनेतील कामे सुरू आहेत. भविष्यात नव्याने होणाऱ्या धरणामुळे सावर्डे व कोंडमळा गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.