
दापोलीत हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड
रत्नागिरी :दापोली तालुक्यामधील विसापूर येथे ७ जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या ५१ वर्षीय प्रवीण दाभो याच्यावर दापोली पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जुलै रोजी प्रवीण दाभो हा विसापूर येथील एका नाल्याच्या पलीकडे निर्जनस्थळी असणाऱ्या घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडखाली हातभट्टीची दारू तयार करत होता. दारू गाळण्याकरिता त्याने भट्टी बांधलेली होती. दारू गाळत असताना दापोली पोलिसांनी धडक कारवाई करीत सुमारे २६,५०० किंमतीचा ऐवज जप्त केला. यामध्ये सुमारे १५०० रुपयाचे अल्युमिनियम भांडे, सफेद रंगाचे कॅन, ७,८०० रुपये किमतीचे ५० लिटर मापाचे अँल्युमिनियम बॉयल, ५०० रुपये किमतीचे बिसलरी बाटलसह फळांची गूळमिश्रित गाळलेली दारू, १२४०० रुपये किमतीचे १२ लिटर मापाचे गुळ मिश्रित रसायन ४०५० रुपये किमतीचे काळ्या रंगाच्या गुळाच्या ढेप, कापडी पिशव्या, १० किलो सोललेली संत्रा फळे असा ऐवज जप्त केला आहे.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार विकास पवार यांनी खबर दिली. आरोपी प्रवीण दाभो याच्यावर महाराष्ट्र दारू अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.