
गणपतीपुळे बसस्थानकाची मोठी दुरावस्था
बसस्थानकावरचे पत्रे फुटून पावसाचे पाणी वाहतूक नियंत्रक कक्षात
रत्नागिरी :रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील मुख्य बसस्थानकाची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. तसेच गेले दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून ये – जा करणाऱ्या सर्वच एसटी गाड्या या पाण्यातच लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्याचबरोबर याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागत असून ये- जा करणाऱ्या प्रवाशांना पावसाच्या चिखलमय झालेल्या पाण्यातूनच बसस्थानकाकडे जावे लागते. तसेच आतमध्ये बसस्थानकात गेल्यानंतर बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाल्याने जीव मुठीत धरुन बसस्थानकात नाईलाजाने बसावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे.
या बसस्थानकाच्या दुरावस्थेमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष व प्रवासी निवारा शेडवरचे पत्रे मोठ्या प्रमाणात फुटले आहेत. तसेच प्रवासी शेडचा संपूर्ण सांगाडा पूर्णपणे जीर्ण झालेला आहे. या बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षावरील पत्रे फुटले असल्याने सध्याच्या पावसाळ्यात येथील वाहतूक नियंत्रण कक्षातील महत्त्वाचे दप्तर भिजून मोठे नुकसान होणार आहे. तसेच प्रवासी शेड सांगाडा पूर्णपणे जीर्ण झाल्याने बसस्थानकात बसलेल्या प्रवाशांच्या अपघाताची ही दाट शक्यता वर्तवली जात आहे.
त्याशिवाय पावसाचे पाणी बसस्थानकातील विद्युत वाहिनीत गेल्यास मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एकूणच या बसस्थानकातील स्वीच बोर्ड व इलेक्ट्रीक वायरिंग ही खराब झाली आहेत.
या संपूर्ण दुरावस्थेबाबत गणपतीपुळे बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी अनेकदा रत्नागिरी एसटी आगाराकडे पत्र देऊन कळविले आहे. परंतु बऱ्याच वेळा तात्पुरती दुरूस्ती करण्याचे काम केवळ संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

एकूणच सध्याची गणपतीपुळे बसस्थानकाची मोठी दुरावस्था लक्षात घेऊन येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी रत्नागिरी एसटी आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन कळविले असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या या बसस्थानकाच्या प्रवासी शेडची,विद्युत प्रणालीची झालेली मोठी दुरावस्था पाहता तातडीने व गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी सर्व प्रवाशी वर्गातून व एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
तसेच सध्याच्या गणपतीपुळे बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत संबंधित गणपतीपुळे बसस्थानकाच्या वाहतूक नियंत्रक यांनी रत्नागिरी आगाराला पत्र देताना त्याची माहितीसाठी प्रत रत्नागिरी बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता यांना दिल्याची माहिती दिली आहे. याकडे स्थानिक प्रशासन म्हणून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने ही लक्ष घालून स्थानिक प्रवासी व पर्यटकांची गैरसोय दूर करावी, असे मत ही सध्या व्यक्त होत आहे.