
दापोली अपघातात जखमी भूमी सावंतचा उपचारा दरम्यान मृत्यू
दापोली : तालुक्यातील आसूद येथील जोशी आळी इथे झालेल्या ट्रक आणि मॅक्सिमो गाडीच्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. या जखमींपैकी मुंबई येथे उपचार घेत असलेल्या भूमी सावंत हिचीही आज प्राणज्योत मालवली आहे. या घटनेला दापोली मधून हळहळ व्यक्त होत आहे.
भूमी सावंत ही लाठी काठी या खेळात तरबेज होती. या खेळामध्ये तिने अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिकं सुद्धा पटकावली होती. एक हरहुन्नरी खेळाडूचं असं निघून जाणं अनेकांसाठी वेदनादायी ठरत आहे.
अपघाताच्या दिवशी दापोलीत तिचा सत्कार होता. त्या दिवशी ती खून आनंदी होती. सत्काराचा कार्यक्रम आटपून ती गावी जात होती. पण ती घरी न पोहोचता थेट रूग्णालयात पोहोचली. रूग्णालयात आठवडाभर तिनं मृत्यूशी झुंज दिली. पण आज पहाटे मुंबई येथे उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. दापोलीकरांनी भूमीला श्रद्धांजली वाहिली आहे.