
शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांसह मद्य बाळगणे, सेवन करण्यावर बंदी
रत्नागिरी :शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली असून, असे करताना आढळल्यास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
शिक्षक भरती आणि शिक्षक बदल्यांसंदर्भात शालेय शिक्षणविभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यात शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बंदी, कारवाईबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर सेवेचे आणि वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन चाचणी घेण्यात येईल. वर्तनात कसूर केल्याचे आढळल्यास सुधारणा करण्याबाबत नोटीस दिली जाईल. सुधारणा न झाल्यास सहा महिन्यांसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात येईल. त्यानंतर सुधारणा न झाल्यास 50 टक्के वेतनावर पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास सक्षम प्राधिकार्यामार्फत कारवाई करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळेत आणि शाळेच्या आवारात मद्य तसेच तंबाखू जन्य पदार्थ बाळगल्यास किंवा
सेवन केल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई होणार आहे. शिक्षण सेवकांचे मूल्यमापन होणार असून, त्यांचा शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या सेवेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्याची मूल्यमापन चाचणी घेण्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्यात येणार आहे.